शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी पुढील सुनावणी 8 एप्रिल रोजी होणार

नवी दिल्ली, 07 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) शिवेसना आमदार अपात्रतेप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यासंदर्भात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने आज ठाकरे गटाला दिलासा दिला. यावेळी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 1 एप्रिलपर्यंत निकालाची मूळ कागदपत्रे कोर्टात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 8 एप्रिल रोजी होणार आहे. तेंव्हा ही सुनावणी हायकोर्टात की सुप्रीम कोर्टात चालणार? याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

 

दोन्ही बाजूचा जोरदार युक्तीवाद!

तत्पूर्वी, आजच्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीने जेष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. तर शिंदे गटाच्या बाजूने वकील हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला. विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबर मध्ये संपणार आहे. त्यामुळे याप्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी व्हावी, नाहीतर या प्रकरणाला अर्थ उरणार नाही, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी यावेळी केली. तर विधानसभा अध्यक्ष आणि सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाने सादर केलेल्या कागदपत्रात मोठी तफावत असल्याचे शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी कोर्टात म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सोबत किती आमदार होते? यासंदर्भात त्यांनी सादर केलेली अनेक कागदपत्रे खोटी असल्याचे देखील हरीश साळवे यांनी यावेळी म्हटले आहे.

राहुल नार्वेकरांनी निकालात काय म्हटले?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल दिला. यावेळी त्यांनी शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार पात्र असल्याचे आपल्या निकालात म्हटले होते. यासोबतच राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना ही शिंदे गटाची असल्याचा निकाल दिला होता. त्यांच्या या निकालाविरोधात ठाकरे गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर आता सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *