बारामती: 20 डिसेंबर: (प्रतिनिधी – अनिकेत कांबळे) बारामती येथील क्रियेटीव्ह अकॅडमी ते प्रगती नगर येथे एका 23 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. अनिकेत सदाशिव गजाकस (वय 23 वर्ष) असे मृत तरूणाचे नाव आहे. फिर्यादीतील माहितीनुसार, हा युवक मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून हल्ला करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या हल्ल्यात अनिकेत गजाकस हा तरूण गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नंदकिशोर पंजाबराव अंभोरे (रा. प्रगती नगर ता. बारामती), महेश नंदकुमार खंडाळे (रा. तांदुळवाडी ता. बारामती) आणि संग्राम खंडाळे (पूर्ण नाव व पत्ता नाही) या तीन जणांच्या विरोधात विरोधात बारामती शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घडताच पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचली असून हे आरोपी सध्या फरार झाले आहेत.