मुंबई, 15 जून: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली आहे. राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 27 जून ते 12 जुलै या कालावधीत मुंबई येथे पार पडणार आहे. यावेळी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये 28 जून रोजी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज 13 दिवस चालणार आहे. तसेच शनिवारी 29 जून रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1801617379299905949?s=19
सल्लागार समितीची बैठक संपन्न
दरम्यान, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विधानभवनात विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची एक बैठक पार पडली. या बैठकीत पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे उपस्थित होते. याशिवाय विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते.
अधिवेशनात हे मुद्दे गाजण्याची शक्यता
दरम्यान, देशात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत विजय मिळवून भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार देशात स्थापन झाले. त्यानंतर आता पुढील काही महिन्यांत राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर, या पावसाळी अधिवेशनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. या अधिवेशनात राज्यातील दुष्काळी परिस्थिती, महागाई, बेरोजगारी, मराठा आरक्षण यांसारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता आहे.