हाथरस, 06 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) हाथरस दुर्घटनेतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याला शुक्रवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे. ही कारवाई उत्तर प्रदेश पोलिसांनी केली आहे. अटक केल्यानंतर त्याला आज कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये 2 जुलै रोजी झालेल्या एका सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या अपघातात सुमारे 121 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेनंतर आरोपी देव प्रकाश मधुकर हा फरार झाला होता. त्याच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी 1 लाख रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले होते.
https://x.com/ANI/status/1809320343879987685?s=19
https://x.com/PTI_News/status/1809296252213063851?s=19
आत्मसमर्पण केल्याचा दावा
दरम्यान, देव प्रकाश मधुकर याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचा दावा वकील एपी सिंग यांनी केला आहे. आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांनी देव प्रकाश मधुकर याला अटक केली असल्याचे या वकिलांनी म्हटले आहे. यूपीचे हाथरस पोलीस दिल्लीतील नजफगढ येथील एका रुग्णालयात पोहोचले होते. तेंव्हा देव प्रकाश मधुकर याने त्यांच्यासमोर आत्मसमर्पण केले, असे ते यावेळी म्हणाले. मात्र, पोलिसांकडून अद्याप अशी कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान, देव प्रकाश मधुकर हा हाथरस येथील सत्संगाच्या कार्यक्रमाचा मुख्य आयोजक असल्याचे सांगितले जात आहे. तर या चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 5 पुरूष आणि 2 महिलांचा समावेश आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उत्तर प्रदेश पोलीस आणि तपास यंत्रणा करीत आहेत.
घटनेनंतर बाबा फरार
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मंगळवारी (दि. 02 जून) बाबा नारायण हरी उर्फ साकार विश्व हरी भोले बाबा याच्या सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 121 जणांचा मृत्यू झाला होता. तर या घटनेत 28 जण जखमी झाले आहेत. या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर हा भोले बाबा फरार झाला आहे. त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, हाथरस दुर्घटनेनंतर भारत सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.