मुंबई, 04 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी आज राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची मुंबईतील राजभवनात भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या नेत्यांनी राज्यपालांकडे राज्यातील सत्ता स्थापनेचा दावा केला आणि त्यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. याप्रसंगी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अशोक चव्हाण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
https://x.com/maha_governor/status/1864266435008319590?t=gjmW79UV5puai3ITxsdvyA&s=19
फडणवीस यांच्या नावाला समर्थन
दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला समर्थन देणारे महायुतीचे पत्र एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यावेळी राज्यपालांनी उद्या संध्याकाळी 5.30 वाजता महायुतीला शपथविधीसाठी आमंत्रित केले आहे.
https://x.com/ani_digital/status/1864279536902263209?t=JpDJqqCYjbwfkCG98EoP0A&s=19
एकनाथ शिंदे शपथ घेणार?
मुंबईतील आझाद मैदानावर उद्या संध्याकाळी 5.30 वाजता राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तसेच अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. परंतु, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिपदाबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. मी मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही? याची घोषणा लवकरच करण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रासाठी एकत्र काम करू: फडणवीस
महायुतीचे नेते महाराष्ट्रासाठी एकत्र काम करणार आहोत. मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय पुढील बैठकीत घेतला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही पदे केवळ तांत्रिक पदे आहेत. महाराष्ट्रासाठी आपण सर्व एकत्र मिळून काम करू. आगामी बैठकीत अन्य मंत्र्यांची नावे निश्चित केली जातील, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी माझ्या नावाची शिफारस करणारे पत्र दिले आहे. तसेच आमच्यासोबत असलेल्या सर्व अपक्ष आमदारांनी देखील राज्यपालांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.