न्यूयॉर्क, 05 जून: (विश्वजीत खाटमोडे) टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला 2 जूनपासून सुरूवात झाली आहे. भारतीय क्रिकेट संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या मोहिमेला आजपासून प्रारंभ करणार आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना आयर्लंडशी होणार आहे. हा सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. या सामन्याकडे भारतीय क्रिकेट रसिकांचे लक्ष असणार आहे.
https://twitter.com/BCCI/status/1798234710830977359?s=19
विराट कोहली सलामीला येणार?
या स्पर्धेच्या आधी भारत बांगलादेश विरुद्ध सराव सामना खेळला होता. या सामन्यात भारताने बांगलादेश संघावर 60 धावांनी विजय मिळवला होता. दरम्यान, बांगलादेश विरुद्धचा सामना ज्या मैदानावर झाला होता, त्याच मैदानावर आजचा सामना खेळविण्यात येणार आहे. याचा फायदा भारतीय संघाला नक्कीच होईल. आजच्या सामन्यात विराट कोहली हा कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला येण्याची शक्यता आहे. कारण, बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात भारताने यशस्वी जैस्वालला संधी दिली नव्हती. अशा परिस्थितीत रोहित शर्मा सोबत कोण सलामीला येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोणाला संधी मिळणार?
तसेच आजच्या सामन्यात भारतीय संघ दोन विकेटकिपर म्हणजे रिषभ पंत आणि संजू सॅमसन यांना संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. हे दोघेही सराव सामन्यात खेळले होते. यासोबतच भारतीय संघ या सामन्यासाठी हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे या दोन अष्टपैलू खेळाडूंची निवड करू शकतो. तर फिरकी गोलंदाजांमध्ये रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव, युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांचा पर्याय भारतीय संघापुढे असणार आहे. या सामन्यात जलदगती गोलंदाजीत जसप्रीत बुमराहची निवड फिक्स आहे. तर अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांपैकी भारतीय संघात कोणाला संधी मिळणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
आजची खेळपट्टी कशी?
न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत बोलायचे झाल्यास, ही अतिशय संथ खेळपट्टी आहे. तसेच याचे मैदानही संथ आहे. त्यामुळे चेंडू सीमापार पाठवणे फलंदाजांना अवघड जाणार आहे. याचा फायदा गोलंदाज घेऊ शकतात. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात या मैदानावर सामना झाला होता. यामध्ये प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ अवघ्या 77 धावांतच संपुष्टात आला होता. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला देखील 78 धावांचे हे लक्ष पार करणे अवघड गेले होते. या सामन्यात आफ्रिकेने 17 व्या षटकात 4 गडी गमावून हे लक्ष्य पार केले.
भारतीय संघ:- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन आणी शिवम दुबे.
आयर्लंडचा संघ:- पॉल स्टर्लिंग (कर्णधार), ॲंड्र्यु बालबर्नी, लोर्कन टकर (विकेटकीपर), हैरी टेक्टर, कर्टिस कैम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलानी, रॉस अडायर, बॅरी मैक्कार्थी, मार्क अडायर, जोशुआ लिटिल, क्रेग यंग, बेंजामिन व्हाइट, नील रॉक आणि ग्राहम ह्यूम.