मुंबई, 05 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने आफ्रिकेविरुद्धची 2 सामन्यांची ही कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली आहे. या विजयाचा भारतीय संघाला मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे भारतीय संघाने आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. यापूर्वी या गुणतालिकेत भारतीय संघ सहाव्या स्थानी होता.
https://x.com/ICC/status/1742872905585774774?s=20
कोणता संघ कोणत्या क्रमांकावर?
तर दुसरीकडे दुसऱ्या कसोटीतील या पराभवाचा फटका दक्षिण आफ्रिका संघाला बसला आहे. या पराभवामुळे आफ्रिकेचा संघ 11 गुण आणि 50 टक्केवारी सह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. भारताविरुद्धची पहिली कसोटी जिंकल्यानंतर आफ्रिकेचा संघ पहिल्या स्थानावर पोहोचला होता. तर या यादीत भारतीय संघ सध्या संघ 26 गुण आणि 54.16 टक्केवारी सह प्रथम क्रमांकावर आहे. त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या गुणतालिकेत न्यूझीलंड तिसऱ्या, ऑस्ट्रेलिया चौथ्या, बांगलादेश पाचव्या, पाकिस्तान सहाव्या, वेस्ट इंडीज सातव्या, इंग्लंड आठव्या आणि श्रीलंका नवव्या स्थानावर आहे.
अशा प्रकारे गुण दिले जातात
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेत सामना जिंकणाऱ्या संघाला 12 गुणांसह 100 टक्केवारी देण्यात येते. सामना बरोबरीत राहिल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 6 गुणांसह 50 टक्के आणि सामना अनिर्णित राहिला तर 4 गुणांसह 33.33 टक्केवारी मिळते. दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची क्रमवारी गुणांच्या आधारे नव्हे तर विजयाच्या टक्केवारीच्या आधारे निश्चित केली जाते.