दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाची विजयाच्या दिशेने वाटचाल

केपटाऊन, 03 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आज केपटाऊन येथील न्यूलँड्स मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावातील धावसंख्या 3 बाद 62 इतकी झाली आहे. तर भारताकडे अद्याप 36 धावांची आघाडी आहे. त्यामुळे या कसोटीवर भारतीय संघाने पकड आणखी मजबूत केली आहे. तर या सामन्याचा उद्याच निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.

https://twitter.com/BCCI/status/1742572285255672147?s=19

सिराजने घेतल्या सहा विकेट!

या कसोटी सामन्यावर गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. या खेळपट्टीवर धावा करताना फलंदाजांना चांगलेच कष्ट करावे लागत आहेत. तत्पूर्वी, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला डाव 55 धावांत संपुष्टात आला. या डावात भारतीय गोलंदाजांनी अतिशय भेदक गोलंदाजी केली. यावेळी भारताच्या मोहम्मद सिराजने 6 विकेट घेण्याचा पराक्रम केला. तर जसप्रीत बुमराह आणि मनोज कुमार यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. त्यामुळे आफ्रिकेच्या 8 फलंदाजांना दुहेरी धावसंख्या देखील गाठता आली नाही. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याने सर्वाधिक 18 धावांची खेळी केली.

https://twitter.com/BCCI/status/1742518714518671519?s=19

भारताला पहिल्या डावात 98 धावांची आघाडी

त्यानंतर भारतीय संघाला त्यांच्या पहिल्या डावात 153 धावाच करता आल्या. विशेष म्हणजे, भारताने शेवटच्या सहा विकेट्स संघाची 153 धावसंख्या असताना एकही धाव न करता गमावल्या. भारतातर्फे विराट कोहलीने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. तर कर्णधार रोहित शर्मा 39 आणि शुभमन गिलने 36 धावा केल्या. तर उर्वरित फलंदाजांना दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. या डावात भारताचे 6 फलंदाज शून्यावर बाद झाले. तर मुकेश कुमार हा शून्यावर नाबाद राहिला. अशाप्रकारे भारतीय संघाने पहिल्या डावात 98 धावांची आघाडी घेतली. तर पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्जर यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

आफ्रिका दुसऱ्या डावात 3 बाद 62 धावा

त्यानंतर आफ्रिकेचा दुसरा डाव सुरू झाला. त्यावेळी आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर आणि एडन मार्कराम यांनी सावध सुरूवात केली. मात्र थोड्याच वेळात डीन एल्गर 12 धावांवर बाद झाला. त्याला मुकेश कुमारने बाद केले. दरम्यान, डीन एल्गरची कसोटी कारकिर्दीतील ही शेवटची खेळी होती. या सामन्यानंतर डीन एल्गर आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. तो बाद झाल्यानंतर भारताच्या सर्व खेळाडूंनी त्याच्यासोबत हस्तांदोलन केले. त्यावेळी आफ्रिकेचे प्रेक्षक आणि खेळाडू भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आजच्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 3 बाद 62 इतकी झाली आहे. तर त्यांचे एडन मार्कराम 36 आणि डेव्हिड बेडिंगहॅम 7 धावांवर खेळत आहेत. या सामन्यात भारताकडे अजूनही 36 धावांची आघाडी आहे. त्यामुळे भारतीय संघ हा सामना जिंकण्याच्या स्थितीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *