छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांच्या दालनाचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला

सातारा, 19 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्षीदार असलेली वाघनखे आज सातारा शहरातील वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. त्यासाठी या वस्तू संग्रहालयात स्वतंत्र दालन तयार करण्यात आले आहे. या दालनाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आता वाघनखे शिवप्रेमींना पाहता येणार आहेत.

https://x.com/mieknathshinde/status/1814297288434696271?s=19

अनेक मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, व्हिक्टोरिया आणि अलबर्ट म्युझियमचे प्रतिनिधी निकोलस मर्चंट, पोस्टमास्टर जनरल किशनकुमार शर्मा, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच हजारो शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

साताऱ्यात भव्य रॅली

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांचे दर्शन आणि वाघनखे ठेवण्यात येणाऱ्या दालनाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त सातारा शहरात आज भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये हे नेते आणि नागरिक सहभागी झाले होते. यावेळी सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यामुळे साताऱ्यातील वातावरण आज शिवमय झाल्याचे दिसून आले.

 

https://x.com/mieknathshinde/status/1814297760897876079?s=19

वाघनखे लंडनमधून भारतात आणली

दरम्यान, लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम मधून ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणण्यात आली असून साताऱ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ती ठेवण्यात येणार आहेत. यासाठी वस्तू संग्रहालयात स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. यामध्ये वाघनखे आणि शिवकालीन शस्त्रेदेखील ठेवण्यात आली आहेत. साताऱ्यातील संग्रहालयात पुढील 10 महिने ही वाघनखे शिवप्रेमींसह सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार आहेत. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *