अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या मूर्तीची निवड झाली

अयोध्या, 02 जानेवारी (विश्वजीत खाटमोडे) अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराचे उद्घाटन येत्या 22 जानेवारी रोजी होणार आहे. यावेळी रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यापूर्वी प्रभू श्री रामाच्या तीन पैकी एका मूर्तीची निवड करण्यात आली आहे. कर्नाटकातील शिल्पकार योगीराज अरुण यांनी कोरलेली प्रभू श्री रामाची मूर्ती अभिषेकासाठी अंतिम करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी त्यांचे सोशल मीडिया हँडल ‘एक्स’ वरून दिली आहे.

https://twitter.com/ani_digital/status/1742024243867484330?s=19

https://twitter.com/ANI/status/1741989714037817769?s=19

“जिथे राम आहे, तिथे हनुमान आहे, अयोध्येत प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठापनासाठी मूर्तीची निवड अंतिम टप्प्यात आली आहे. आपल्या देशाचे एक प्रसिद्ध शिल्पकार, आपला अभिमान श्री योगीराज अरुण यांनी कोरलेली रामाची मूर्ती अयोध्येत बसवली जाणार आहे. राम हनुमानाच्या अतूट नात्याचे हे आणखी एक उदाहरण आहे. कर्नाटकातील हनुमानाच्या भूमीतून रामलल्लानींची ही महत्त्वाची सेवा आहे यात काही शंका नाही.” असे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. यासोबतच त्यांनी अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा फोटो देखील शेयर केला आहे.



दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी रोजी राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे, ज्यात हजारो मान्यवर आणि करोडो लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. यावेळी अयोध्येत 14 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत अमृत महोत्सव साजरा केला जाईल. तसेच 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. वाराणसीचे पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित हे 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याचे मुख्य विधी पार पाडतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *