छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराला हायकोर्टाचे शिक्कामोर्तब

मुंबई, 08 मे: (विश्वजीत खाटमोडे) औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका मुंबई हायकोर्टाने आज फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने केलेल्या छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतरावर हायकोर्टाने आज शिक्कामोर्तब केले आहे. तत्पूर्वी, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात येथील काही स्थानिक रहिवाशांनी मुंबई हायकोर्टात अनेक याचिका दाखल केल्या होत्या. परंतु, मुंबई हायकोर्टाने आज त्यांच्या सर्व जनहित आणि रिट याचिका फेटाळून लावल्या आहेत. राज्य सरकारचा हा निर्णय बेकायदेशीर नसल्याचे यावेळी कोर्टाने म्हटले आहे.

कोर्टाने काय म्हटले?

यासंदर्भात सरन्यायाधीश डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुनावणी झाली. राजकीय फायद्यासाठी राज्य सरकारने या दोन्ही शहरांचे नामांतर केले असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारने घेतलेला नामांतराचा निर्णय वैध असून त्यात कोणत्याही हस्तक्षेपाची गरज नसल्याचे यावेळी ह्या खंडपीठाने म्हटले आहे. राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे बदलून जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीरपणा किंवा कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नाही, असेही कोर्टाने यावेळी म्हटले आहे.

असा झाला नामांतराचा निर्णय

दरम्यान, ठाकरे सरकारने त्यांच्या कार्यकाळात सर्वप्रथम 2022 मध्ये औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर केले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयाला स्थगिती दिली. त्यानंतर काही दिवसांनी शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर केले. तर केंद्र सरकारने राज्य सरकारच्या या निर्णयाला 24 फेब्रुवारी 2023 रोजी मंजुरी दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *