मुंबई, 18 मेः आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष एम. डी. शेवाळे यांच्या निधन झाले. त्यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळीचे मार्गदर्शक दीपस्तंभ नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवंगत एम. डी. शेवाळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ज्येष्ठ नेते एम.डी. शेवाळे यांनी आंबेडकरी चळवळीत भरीव योगदान दिले आहे. ते पुण्यात वास्तव्यास होते. मधुकर धर्माजी उर्फ एम.डी. शेवाळे म्हणून ते राज्यात आंबेडकरी चळवळीत लोकप्रिय होते. एम.डी. शेवाळे सर हे आंबेडकरी चळवळीतील आदर्श आणि आदरस्थान प्राप्त व्यक्तिमत्व होते. त्यांचे 17 मे 2022 रोजी पुण्यात वयाच्या 78 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून आणि चार मुली, जावई तसेच नातवंडे असा परिवार आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रमाण मानून काम करणारे एम.डी. शेवाळे सरांनी मला 30 वर्षे एकनिष्ठ साथ देत रिपब्लिकन पक्ष गतिमान ठेवला. माझ्या नेतृत्वावर त्यांनी अतूट विश्वास ठेवून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष आणि पुणे जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून त्यांनी चांगले काम केल्याचे आठवलेंनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनमध्ये एम.डी. शेवाळे यांनी काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सान्निध्य त्यांना त्यांच्या तरुण वयात लाभले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या शैक्षणिक संस्थेत काम केले. रा. सु. गवई यांच्या नेतृत्वात त्यांनी अनेक वर्षे रिपब्लिकन पक्षात काम केले. रिपब्लिकन ऐक्य झाल्यानंतर ते माझ्या सोबत जोडले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन संकल्पनेसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांचा स्वभाव नम्र विनयशील असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.
एम.डी. शेवाळे सरांनी सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कर्तृत्व उभारले. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेले काम आदर्शवत आहे. राजकीय क्षेत्रात नेतृत्व करताना सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात रचनात्मक काम करण्याचा आदर्श त्यांनी नवीन पिढीला घालून दिला. ज्येष्ठ नेते एम.डी. शेवाळे सरांचे नेतृत्व कर्तृत्व रिपब्लिकन चळवळीसाठी सदैव प्रेरणादायी आदर्श मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळीची कधीही भरून येणार नाही, अशी हानी झाली आहे, अशी शोकभावना ना. रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोक संदेशात व्यक्त केली आहे. आज पुण्यात दिवंगत एम.डी. शेवाळे सरांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात येत असून त्यात नारामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.