बारामती, 17 ऑगस्टः बारामती शहरातील शारदा प्रांगणवर समूह राष्ट्रगीत गायन आज, 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 च्या सुमारास संपन्न झाले. बारामती नगर परिषदेकडून स्वराज्य महोत्सव अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन घेण्यात आले. या समूह राष्ट्रगीत गायनावेळी बारामती शहरातील भिगवण चौकात नागरिक जागेवर उभे राहून राष्ट्रगीत म्हणतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 9 ते 17 ऑगस्ट 2022 दरम्यान, राज्यभरात स्वराज्य महोत्सव राबविण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीत गायन घ्यावेत. या उपक्रमात जिल्हास्तर, तालुकास्तर, ग्रामस्तरावरील खाजगी, शासकीय तसेच इतर सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, खाजगी आस्थापना, व्यापारी संघटना, संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालय, अधिकारी व कर्मचारी, राजकीय पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन शासनाकडून देण्यात आला होता. तसेच समूह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी जाणते- अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही आवाहन करण्यात आले होते.
तिरंगा उतरवण्यास बारामतीकरांना पडला विसर
शासनाच्या या आवाहनानुसार, बारामती शहरातील शारदा प्रांगणात आज, सकाळी 10.45 वाजता समूह राष्ट्रगीत गायनासाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचे नगर परिषदेकडून आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिकांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. शहरात विविध ठिकाणी, सर्व शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, शासकीय, निमशासकीय कार्यालायतील अधिकारी कर्मचारी तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी आज, सकाळी ठिक 11 वाजता स्तब्ध उभे राहून समूह राष्ट्रगीत गायन केले. शहरातील चौका चौकात समूह राष्ट्रगीत गायन म्हणतानाचे चित्र होते. तसेच बारामती बस स्थानकातही समूह राष्ट्रगीत गायन संपन्न झाले.