एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पहिली यादी प्रसिद्ध! आठ उमेदवारांची केली घोषणा

मुंबई, 28 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने आज आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. यावेळी शिवसेनेकडून त्यांच्या 8 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मात्र कल्याण मतदार संघाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. कल्याणमधून सध्या एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे विद्यमान खासदार आहेत. या निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांचे तिकीट जवळपास नक्की असल्याचे म्हटले जात आहे. तरी देखील त्यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर झाले नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यादीमध्ये या उमेदवारांची नावे

शिवसेना पक्षाच्या या यादीनुसार मुंबई-दक्षिण मध्य मतदार संघातून राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून संजय मंडलिक, शिर्डी मधून सदाशिव लोखंडे, बुलढाणा मधून प्रतापराव जाधव, हिंगोली मधून हेमंत पाटील, मावळ लोकसभा मतदार संघातून श्रीरंग बारणे, रामटेक मधून राजू पारवे आणि हातकणंगले मतदार संघातून धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कोणाला किती जागा मिळणार?

दरम्यान, महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. काही जागांवर सध्या महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी महायुतीतर्फे आतपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने 8 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तर भाजपने 24 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. सोबतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने आतापर्यंत 2 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीत कोणत्या पक्षांना किती जागा मिळणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *