मुंबई, 25 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सध्या हैदराबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. या सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ आज समाप्त झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने त्यांच्या पहिल्या डावात 23 षटकांत 1 बाद 119 धावा केल्या होत्या. यावेळी यशस्वी जैस्वाल 76 आणि शुभमन गिल 14 धावांवर खेळत आहेत. तत्पूर्वी, या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडकडे अद्याप 127 धावांची आघाडी आहे.
https://twitter.com/BCCI/status/1750478447129116794?s=19
इंग्लंडचा पहिला डाव 246/10
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी इंग्लंडचा संपूर्ण संघ 246 धावांवर बाद झाला. यावेळी इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावांची खेळी केली. तर या व्यतिरिक्त इंग्लंडच्या काही फलंदाजांना चांगली सुरूवात मिळून देखील मोठी धावसंख्या करता आली नाही. यामध्ये जॉनी बेअरस्टो (37), बेन डकेट (35), जॅक क्रॉली (20), जो रूट (29) आणि टॉम हार्टली (23) हे फलंदाज लवकर बाद झाले. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात 246 धावा करता आल्या. भारताकडून आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 3, तर जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
यशस्वी जैस्वालची तुफान फटकेबाजी
त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची चांगली सुरूवात झाली. भारताच्या रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या सलामीवीरांनी 80 धावांची सलामी दिली. त्यावेळी कर्णधार रोहित शर्मा 24 धावा करून बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी शुभमन गिल आला. तो सध्या 14 धावांवर खेळत आहे. शुभमन गिलसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामन्यात मोठी खेळी करून संघातील स्थान कायम ठेवण्याची संधी त्याला मिळाली आहे. तर या सामन्यात दुसरीकडे यशस्वी जैस्वाल तुफान फटकेबाजी करीत आहे. यशस्वी जैस्वाल सध्या 70 चेंडूत 76 धावांवर खेळत आहे. त्याने या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत. सध्या या सामन्यात भारत सुस्थितीत आहे. तर उद्याच्या दिवशी मोठी धावसंख्या करून इंग्लंडच्या संघावर दबाव आणण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असणार आहे.