दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला; भारतीय संघ मजबूत स्थितीत!

विशाखापट्टणम, 02 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. त्यावेळी भारताची पहिल्या डावातील धावसंख्या 6 बाद 336 धावांवर पोहोचली आहे. सध्या भारताचे यशस्वी जैस्वाल 179 आणि रविचंद्रन अश्विन 5 धावांवर खेळत आहेत. आजच्या दिवशी इंग्लंडकडून रेहान अहमद आणि शोएब बशीरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर टॉम हार्टले आणि जेम्स अँडरसनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

https://twitter.com/BCCI/status/1753376891443314940?s=19

पहिल्या दिवसाअखेर टीम इंडिया 336/6

तत्पूर्वी, या सामन्यासाठी भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. दुखापतग्रस्त केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्या जागी कसोटी पदार्पण करणाऱ्या रजत पाटीदार आणि कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला आहे. तर मोहम्मद सिराजच्या जागी मुकेश कुमार संघात खेळत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने पहिल्या डावात 93 षटकांत 6 गडी गमावून 336 धावा केल्या आहेत. यामध्ये भारताच्या यशस्वी जैस्वालने शानदार शतक झळकावले. त्याने 257 चेंडूंत 17 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 179 धावा केल्या. त्याच्यासोबत सध्या आर अश्विन 5 धावांवर नाबाद खेळत आहे.

यशस्वी जैस्वाल द्विशतकाच्या उंबरठ्यावर!

तर कर्णधार रोहित शर्मा (14), शुभमन गिल (34), श्रेयस अय्यर (27), रजत पाटीदार (32), अक्षर पटेल (27) आणि श्रीकर भरत (17) यांना चांगली सुरूवात मिळून देखील मोठी खेळी करता आली नाही. यामध्ये रजत पाटीदारने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात 32 धावांची खेळी केली. मात्र, तो रेहान अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. दरम्यान, या सामन्यात सध्या भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आपल्या द्विशतकाच्या जवळ पोहोचला आहे. त्याने उद्याच्या दिवशी 21 धावा केल्यास त्याला कसोटीतील पहिले द्विशतक करण्याची संधी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *