पुणे, 21 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, इयत्ता 12 वीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 ते 18 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. तर इयत्ता 10 वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025 यादरम्यान होणार आहे. या परीक्षांचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.
तोंडी परीक्षा कधी होणार?
याबरोबरच इयत्ता 12 वीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेब एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा 24 जानेवारी 2025 ते 10 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. तसेच इयत्ता 10 वीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 3 फेब्रुवारी 2025 ते 20 फेब्रुवारी 2025 या काळात होणार आहे. याची माहिती देखील शिक्षण मंडळाने दिली आहे.
दरम्यान, राज्यात इयत्ता दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय शिक्षण मंडळाअंतर्गत घेतली जाते. राज्यभरात दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात येते. या परीक्षांचा निकाल मे-जून महिन्याच्या आसपास लागत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना या परीक्षेची तयारी करता यावी त्यासाठी शिक्षण मंडळाने काही महिने आधीच या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.