धर्मशाळा, 07 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आजपासून खेळविण्यात येत आहे. हा सामना धर्मशाळा येथील क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. या मालिकेत भारताने 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे पाचव्या सामन्यात विजय मिळवून ही मालिका 4-1 ने जिंकण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असणार आहे. दरम्यान, आजच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
https://twitter.com/BCCI/status/1765582837586211061?s=19
भारताची 3-1 ने विजयी आघाडी
तत्पूर्वी, या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने 28 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर भारताने दुसऱ्या कसोटीत 106 धावांनी, तिसऱ्या कसोटीत 434 धावांनी विजय मिळवला होता. तसेच चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने 4 गडी राखून विजय मिळवत 5 सामन्यांची ही मालिका जिंकली होती. तर आता या सामन्याकडे भारतीय क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.
देवदत्त पडिक्कलचे संघात पदार्पण
पाचव्या कसोटीच्या एक दिवस आधी इंग्लंडने त्यांचा संघ जाहीर केला होता. यामध्ये इंग्लंडने आपल्या संघात एक बदल केला होता. त्यानूसार, ऑली रॉबिसनच्या जागी मार्क वुडचे इंग्लंडच्या संघात पुनरागमन झाले आहे. तसेच आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल केलेले आहेत. यामध्ये रजत पाटीदारच्या जागी देवदत्त पडिक्कलला पदार्पणाची संधी मिळाली आहे. तर जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे आकाशदीप याला बाहेर बसावे लागले आहे.
कशी आहे धर्मशाळाची खेळपट्टी?
आजचा कसोटी सामना धर्मशाळा येथे खेळविण्यात येत आहे. धर्मशाला येथे आतापर्यंत फक्त एकच कसोटी सामना खेळला गेला आहे. 2017 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना झाला होता. यामध्ये भारताने विजय मिळवला होता. दरम्यान, धर्मशाळाच्या खेळपट्टीविषयी बोलायचे झाल्यास, धर्मशाळा येथे सध्या थंड वातावरण आहे. त्यामुळे या मैदानावर खेळताना इंग्लंडला घरच्याच मैदानावर खेळत असल्यासारखे वाटेल. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते. त्यामुळे या सामन्यात गोलंदाजांना घाम गाळावा लागण्याची शक्यता आहे. मात्र, या खेळपट्टीवर सामन्याच्या तिसऱ्या दिवसांपासून फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय संघ:-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड संघ:-
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन आणि मार्क वुड.