पुणे, 20 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) रस्ता खचल्याने पुणे महानगरपालिकेचा एक ट्रक अचानकपणे खड्ड्यात पडल्याची घटना घडली आहे. ही घटना पुणे शहरातील लक्ष्मी रोड परिसरातील समाधान चौक येथील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारात घडली आहे. पेव्हर ब्लॉक खाचल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे दिसून येत आहे. सुदैवाने, ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक मधून वेळीच उडी मारली. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. दरम्यान, या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, त्याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
https://x.com/ANI/status/1837115953886478532?s=19
ड्रायव्हरने वेळीच प्रसंगावधान राखले
पुणे शहरातील लक्ष्मी रस्त्यावरील समाधान चौकात सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारात आज दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. याठिकाणी अचानकपणे रास्ता खचल्याने पुणे महानगरपालिकेचा ट्रक 30 ते 40 फूट खोल खड्ड्यात पडला. सीसीटीव्ही फुटेज मध्ये हा ट्रक पूर्णपणे खड्ड्यात पडल्याचे दिसत आहे. ट्रक चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून उडी मारल्याने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. दरम्यान, या ट्रकसह शेजारी पार्क केलेल्या दोन दुचाकी गाड्या देखील ह्या खड्ड्यात पडल्याची माहिती समोर आली आहे.
अग्निशमन दलाचे पथक दाखल
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून सध्या खड्ड्यात पडलेला हा ट्रक बाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम केले जात आहेत. या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचा सध्या शोध घेतला जात आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेचा हा ट्रक याठिकाणी सफाई करण्यासाठी आला होता.