मुंबई, 03 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकरवाडी या गावातील नागरिकांनी ईव्हीएमच्या मतदानावर संशय व्यक्त करीत थेट बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती. या गावात आज (दि.03) ही मतदान प्रक्रिया पार पडणार होती. त्यासाठी गावकऱ्यांकडून सर्व तयारी देखील करण्यात आली होती. परंतु, प्रशासनाने दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर मारकरवाडी ग्रामस्थांनी ही मतदान प्रक्रिया थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निवडणूक आयोगाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. या गावात प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या प्रक्रियेत कोणतीही विसंगती आढळलेली नाही. तसेच निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार पारदर्शकपणे पार पडल्यानंतरच निकाल घोषित करण्यात आला असल्याचे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
https://x.com/CEO_Maharashtra/status/1863870864779055452?t=XeKky5b99612M6jOrjB1AA&s=19
निवडणूक आयोगाने काय म्हटले?
मारकरवाडी येथे 96, 97 आणि 98 या क्रमांकाची अशी तीन मतदान केंद्रे येतात. या तीनही मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या प्रक्रियेत कोणतीही विसंगती आढळलेली नाही. मतदानाच्या दिवशी प्रत्येक केंद्रावर उमेदवारांचे पोलिंग एजंट उपस्थित होते आणि त्यांच्याकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. त्याचप्रमाणे मतमोजणीच्या वेळी देखील उमेदवारांचे काऊंटिंग एजंट उपस्थित होते. त्यांच्याकडून देखील मतमोजणी दरम्यान किंवा नंतरही कोणताही आक्षेप नोंदवण्यात आलेला नाही. तसेच फेरमतमोजणीची कोणतीही मागणी झाली नाही. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार पारदर्शकपणे पार पडल्यानंतरच निकाल घोषित झाला आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
निवडणुकीशी संबंधित प्रत्येक टप्प्यावर उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधींना सहभागासाठी नियमानुसार वेळोवेळी कळवले गेले होते. यानुसार उमेदवारांचे प्रतिनिधि निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी सुद्धा झाले होते. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणुकीपूर्वी आणि मतदानाच्या दिवशी मतदानापूर्वी चाचणी मतदानही घेतले गेले. मतदान यंत्रांच्या फर्स्ट लेवल चेक (एफएलसी) आणि कामिशनिंग ह्या टप्प्यावर राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चाचणी मतदान घेतले आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान यंत्रावर 50 मतांची चाचणी घेतली गेली. या कोणत्याही टप्प्यावर संबंधितांकडून कोणत्याही तक्रारी वा आक्षेप नोंदवले गेलेले नाहीत. प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून प्रक्रिया पूर्ण केली आहे. एकंदर मतदान, मतमोजणी आणि निकाल प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा विसंगती आढळली नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विजया भांगळालकर यांनी यावेळी सांगितले आहे.
गावातील निवडणूक प्रक्रिया स्थगित
दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस विधानसभा संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तमराव जानकर आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात सामना होता. या निवडणुकीत मारकरवाडी गावातील ग्रामस्थांनी उत्तमराव जानकर यांना राम सातपुते यांच्यापेक्षा जास्त मतदान केले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालात या गावात राम सातपुते यांना जास्त मते मिळाली. त्यानंतर मारकरवाडी गावातील ग्रामस्थांनी ईव्हीएमच्या मतदानावर संशय व्यक्त करीत थेट बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. मात्र प्रशासनाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली होती. तसेच त्यांनी मारकरवाडी गावात जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिले होते. प्रशासनाकडून झालेल्या विरोधानंतर मारकरवाडी ग्रामस्थांनी आज होणारी मतदान प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतला.