पुणे, 30 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड प्रमाणात यश मिळविले आहे. या निवडणुकीत महायुतीला 230 जागांवर बहुमत मिळाले आहे. यात भाजपला सर्वाधिक 132 जागा, शिवसेना 57 आणि राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राज्यात नवे सरकार कधी स्थापन होणार? आणि राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात जास्त आघाडीवर आहे. तसेच मुख्यमंत्री पदासाठी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्या नावाच्या देखील चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिले आहे.
https://x.com/mohol_murlidhar/status/1862571924204765609?t=EMTZiFmEu4Repm7_bhcHpA&s=19
मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण
समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे, असे मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात उलटले आहेत. तरीही राज्यात नवे सरकार अद्याप स्थापन झाले नाही. त्यामुळे राज्यात महायुतीतील कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार? तसेच राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी कधी आणि कोठे होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.