दिल्ली, 02 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यांची ही याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. दरम्यान, राज्य सरकारने महाराष्ट्रातील औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव केले होते. तत्पूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने मे महिन्यात या दोन्ही शहरांच्या नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या होत्या. तर सुप्रीम कोर्टाने आता मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील ही दोन्ही शहरे आता छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव म्हणून अधिकृतपणे ओळखली जाणार आहेत.
https://x.com/barandbench/status/1819251493561618636?s=19
हायकोर्टाने याचिका फेटाळली होती
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मागील महाविकास आघाडी सरकारने 29 जून 2021 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 16 जुलै 2022 रोजी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांचे नामांतर करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली होती. त्यानंतर तेथील काही स्थानिक लोकांनी शिंदे सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यावेळी उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती.
सुप्रीम कोर्टात धाव
त्यानंतर या याचिकाकर्त्यांनी यासंदर्भात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. परंतु, न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. दरम्यान, या शहरांचे नामांतर राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप या याचिकाकर्त्यांनी नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिकेत केला होता. मात्र, महाराष्ट्र सरकारने त्यांचा हा दावा फेटाळून लावत शहरांच्या नामांतराला राजकीय रंग नसल्याचे स्पष्ट केले होते.