मुंबई, 30 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागला. निकाल लागून आठवडा झाला तरीही राज्यात अद्याप नवे सरकार स्थापन झालेले नाही. त्यामुळे राज्यात नवे सरकार कधी स्थापन होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात राज्यात विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. याशिवाय राज्यातील सत्ता स्थापनेच्या मुद्यावरून विरोधक देखील महायुतीच्या नेत्यांवर टीका करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (दि.30) नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख जाहीर केली आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
https://x.com/cbawankule/status/1862845509289095281?t=_1RwnvmwAhnK_UI_BTrFxA&s=19
येथे होणार शपथविधी सोहळा!
महाराष्ट्रातील महायुती सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबर रोजी होणार आहे. हा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पोस्टमधून दिली आहे. त्यामुळे नवीन सरकारचा शपथविधी कधी होणार? याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
नवीन मुख्यमंत्री कोण?
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारचा शपथविधी सोहळा कधी आणि कोठे होणार? याची माहिती दिली असली तरी, मात्र त्यांनी राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याची माहिती दिलेली नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी कोणाला संधी मिळणार? यासंदर्भात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री पदासाठी अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. परंतु, नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार? याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.