धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश! लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित

अकलूज, 15 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्यासोबत पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून माढा लोकसभा मतदार संघात उमेदवारी मिळणार, हे जवळपास नक्की झाले आहे. ते येत्या 16 एप्रिल रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/NCPspeaks/status/1779565017429598420?s=19

माढ्यात निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील?

यंदा माढा लोकसभा मतदार संघातून भाजपने रणजीतसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. अशा परिस्थितीत या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदार संघात रणजीतसिंह निंबाळकर विरूद्ध धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तत्पूर्वी, धैर्यशील मोहिते पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या.

पक्षप्रवेशाला विजयसिंह मोहिते पाटलांचा पाठिंबा!

दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत. मोहिते पाटलांचे सोलापूर जिल्ह्यातील अनेक मतदार संघावर वर्चस्व राहिले आहे. तसेच विजयसिंह मोहिते पाटील यांचा देखील धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा आहे. मोहिते पाटलांचा पाठिंबा असल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांना होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *