नवी दिल्ली, 03 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. त्यानंतर दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या दिल्ली येथील भाजपच्या मुख्यालयात आले होते. यावेळी नरेंद्र मोदी विजयोत्सवात सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात हात जोडून समर्थकांचे स्वागत केले. तसेच त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना त्यांच्या भाषणातून संबोधित केले. आजचा विजय ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या कल्पनेचा आज विजय झाला आहे. अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi says "Today every poor is saying that he himself has won. Every deprived person has a feeling in his mind that he has won the election. Every farmer says that he has won this election. Today, every tribal brother and sister is happy… pic.twitter.com/X9WgitJN75
— ANI (@ANI) December 3, 2023
“आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा आज विजय झाला, वंचितांच्या प्राधान्याच्या विचाराचा विजय झाला, देशाच्या विकासासाठी राज्यांच्या विकासाच्या विचाराचा विजय झाला. या निवडणुकीत जातींच्या आधारे देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न झाला. मात्र मी म्हणत राहिलो की, माझ्यासाठी नारी शक्ती, युवा शक्ती, किसान आणि गरीब परिवार या चार जाती महत्त्वाच्या आहेत.” असे ते यावेळी म्हणाले.
“आज प्रत्येक गरीब म्हणतोय की तो स्वतः जिंकला आहे. प्रत्येक वंचित व्यक्तीच्या मनात आपण निवडणूक जिंकलोय अशी भावना आहे. प्रत्येक शेतकरी म्हणतो की मी ही निवडणूक जिंकली आहे. आज प्रत्येक आदिवासी बांधव आणि भगिनीला हा विचार करून आनंद होतो की, आपण जो विजय मिळवला तो आपलाच आहे. प्रत्येक पहिल्यांदा मतदान करणारा प्रत्येक मतदार मोठ्या अभिमानाने म्हणतो की माझे पहिले मत माझ्या विजयाचे कारण ठरले आहे,” असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
राहुल गांधींनी निवडणुकीतील पराभव स्वीकारला
“मला देशाच्या ‘नारी शक्ती’ बद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मी यापूर्वी अनेकदा म्हटले होते की, नारी शक्तीने भाजपचा झेंडा उंचवण्याचे ठरवले आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीत मी नेहमीच भाकित करण्यापासून दूर राहिलो. पण यावेळी मी हा नियम मोडला. राजस्थानमध्ये मी भाकीत केले होते की, राजस्थानमध्ये काँग्रेस परतणार नाही. कारण माझा राजस्थानच्या जनतेवर विश्वास होता. काही लोक आज असेही म्हणत आहेत की, आजच्या हॅट्रिकने 2024 च्या हॅट्रिकची गॅरंटी दिली आहे,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.
“मतदाराला त्याची जीवनशैली सुधारण्यासाठी एका सुव्यवस्थित रोडमॅपची गरज आहे. भारताच्या मतदाराला माहित आहे की, जेव्हा भारत पुढे जातो तेव्हा राज्य पुढे जाते आणि प्रत्येक कुटुंबाचे जीवन सुधारते. त्यामुळे, मतदार भाजपला सतत निवडत आहेत. आज आपण निकाल पाहत आहोत. मध्य प्रदेशात भाजपला पर्याय नाही. भाजप 2 दशकांपासून सत्तेत आहे आणि एवढ्या मोठ्या कालावधीनंतरही लोकांचा भाजपवरील विश्वास सतत वाढत आहे. छत्तीसगडमधील पहिल्या जाहीर सभेत 3 डिसेंबरनंतर जेव्हा आम्ही सरकार स्थापन करू हे मी म्हणालो होतो.” असे मोदींनी यावेळी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपने 3 राज्यांची सत्ता मिळवली
“काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना माझी सूचना आहे की, देशद्रोही घटक आणि देशाला कमकुवत करण्यासाठी विचारांना बळ देणारे राजकारण करणे थांबवावे. भ्रष्टाचार, तुष्टीकरण आणि परिवारवाद यांच्या विरोधात शून्य सहिष्णुता असल्याचेही आजच्या जनादेशाने सिद्ध केले आहे. या तीन वाईट गोष्टींचा नायनाट करण्यात जर कोणी प्रभावी असेल तर तो फक्त भाजप आहे, असे देशाला वाटते,” असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
“भ्रष्टाचाराविरुद्धची मोहीम भाजपने सुरू केली. देशातील भाजपच्या केंद्र सरकारला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यात ज्यांना लाजही वाटत नाही त्यांना आज देशातील जनतेने स्पष्ट संदेश दिला आहे.जे लोक बदनाम करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. भ्रष्टाचारावर कठोरपणे उतरलेल्या तपास यंत्रणांनी हे समजून घेतले पाहिजे की हा निवडणूक निकाल भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याला जाहीर पाठिंबा आहे. जेव्हा इतरांच्या आशा संपतात तेव्हा मोदींची हमी सुरू होते.” असे त्यांनी म्हटले आहे.
“हे निवडणूक निकाल काँग्रेस आणि त्यांच्या ‘घमांडिया महाआघाडी’ साठीही एक मोठा धडा आहे. धडा असा आहे की, केवळ काही कुटुंबातील सदस्य मंचावर एकत्र येऊन देशाचा विश्वास जिंकता येत नाही. देशातील जनतेची मने जिंकण्यासाठी जी राष्ट्रसेवा असली पाहिजे ती घमांडिया महाआघाडीत नाही,” अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीका केली आहे.
One Comment on “आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा आज विजय झाला – नरेंद्र मोदी”