छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली

मुंबई, 29 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एक बैठक बोलावली होती. ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी एक समिती नेमण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा उभारण्यासाठी आणखी एक समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.

https://x.com/CMOMaharashtra/status/1828878882688192595?s=19

बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधण्यासाठी तसेच एकूणच या घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत घेतला आहे. सोबतच मुख्यमंत्र्यांनी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समिती नेमण्याचे निर्देश देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.



या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. तसेच याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अतिरिक्त मुख्य गृह सचिव इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य नगर विकास सचिव असीम कुमार गुप्ता, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस ऍडमिरल अजय कोचर, रियर ऍडमिरल मनीष चढ्ढा, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *