तळवडे, 09 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पिंपरी चिंचवड परिसरातील तळवडे येथील स्पार्कल कँडल बनविणाऱ्या कारखान्यात काल दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत 6 महिलांचा होरपळून मृत्यू झाला, तर 8 कामगार यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1733161531775537455?s=19
पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील स्पार्कल कँडल बनविणाऱ्या कारखान्याच्या आग दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. असे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवड परिसरातील तळवडे येथील स्पार्कल कँडल बनविणाऱ्या कारखान्यात काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अचानकपणे आग लागली. त्यानंतर काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले. त्यावेळी एक मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की, त्या आवाजाने या कारखान्यातील एकमेव शटर बंद झाले. त्यामुळे या कारखान्यात मजूर अडकून राहिले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेत 6 महिलांचा होरपळून मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले आहेत. तर सध्या या दुर्घटनेतील मृतांची ओळख पटली आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि या आगीतून लोकांना बाहेर काढले. या जखमींवर सध्या वायसीएम आणि ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी दिली आहे. तर याप्रकरणी आता कंपनी मालकासह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर ही आग कशी लागली आणि या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे? याची चौकशी सध्या पोलीस करीत आहेत.