लातूर, 04 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) गेल्या काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे तेथील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी आज (दि.04) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि जळकोट तालुक्यातील नुकसानग्रस्त शेती पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच त्यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले.
https://x.com/CMOMaharashtra/status/1831319745909363037?s=19
पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना
या प्रत्यक्ष पाहणीमध्ये लातूर जिल्ह्यातील सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे त्यांच्या समोर आले आहे. तसेच या ठिकाणच्या सोयाबीन पिकात अद्यापही पाणी साचलेले दिसत आहे. त्यामुळे नियम आणि निकष न पाहता एनडीआरएफच्या निकषांपेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल. संकट काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार आहे, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. सोबतच अतिवृष्टीनंतर मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नुकसान भरपाई देण्याची मागणी
दरम्यान, मुसळधार पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारने नुकसान भरपाई देण्याची अपेक्षा शेतकरी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी देखील सरकारकडे शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात राज ठाकरे, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात यांसारख्या अनेक नेत्यांनी ही मागणी केली आहे.
https://x.com/AUThackeray/status/1831257858962530423?s=19
आदित्य ठाकरेंनी केली शेती पिकांची पाहणी
याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड आणि परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण गावातील बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेती पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीनची पिके पाण्याखाली गेली असताना, मायबाप बळीराजा हवालदिल झालाय. घटनाबाह्य सरकारला विनंती आहे, बळीराजाला वाऱ्यावर सोडू नका. तातडीने मदत द्या, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.