मुंबई, 30 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) युनेस्कोच्या 2024-25 च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांच्या नामांकनाचा प्रस्ताव केंद्र सरकारने पाठविला आहे. महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या 11 किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादी (World Heritage List) मध्ये नामांकनासाठी पाठविण्यात आला आहे. युनोस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये स्थान मिळावे, यासाठी केंद्र सरकारने हा प्रस्ताव पाठवला आहे. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1752308948949217678?s=19
मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार!
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या नामांकनाचा प्रस्ताव पाठवल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त केला आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी यावेळी केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाचे आभार मानले आहेत. या किल्ल्यांना शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा, ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे त्यावर अंतिम मोहोर देखील नक्कीच उमटेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे. युनेस्कोच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्राला नामांकन ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1752198025068400890?s=19
हा महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण: उपमुख्यमंत्री
तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. “आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठा लष्करी रणभूमीचा परिसर अर्थात गडकिल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव भारत सरकारने युनेस्कोला सादर केला आहे. 2024-25 या वर्षासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव सादर केल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे अनेकानेक आभार,” असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांच्या नामांकनाचा प्रस्ताव पाठवल्यामुळे या किल्ल्यांना आता जगभरात नवी ओळख मिळू शकणार आहे.