डीपफेक संदर्भात केंद्र सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत

दिल्ली, 23 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) डीपफेक संदर्भात केंद्र सरकार आता ॲक्शन मोडवर आले आहे. केंद्र सरकार डीपफेकबाबत कठोर भूमिका घेणार असल्याची माहिती केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. केंद्र सरकार डीपफेक विरोधात लवकरच मोठी पावले उचलणार आहे, असे ते यावेळी म्हणाले. सरकार लवकरच अशा प्रकारचे डीपफेक व्हिडिओ बनवणाऱ्या तसेच असे व्हिडिओ पोस्ट झालेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म संदर्भात कडक कायदा आणि दंडाची तरतूद करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात अश्विनी वैष्णव यांनी आज एआय क्षेत्रातील सर्व कंपन्या, नॅसकॉम आणि प्राध्यापकांची बैठक घेतली.

विधानसभा अध्यक्ष सुनावणी लांबवत आहेत, ठाकरे गटाचा आरोप

या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत अश्विनी वैष्णव म्हणाले की, “डीपफेक समाजात एक नवीन धोका म्हणून उदयास आला आहे. आम्हाला त्वरित पावले उचलण्याची गरज आहे. आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक बैठक झाली. या बैठकीत सर्वांशी चर्चा झाली आणि यावेळी सर्वांनी डीपफेकचा धोका आणि त्याचे गांभीर्य मान्य केले. काही आठवड्यांत आम्ही डीपफेक कायदेशीर कक्षेत आणण्यासाठी मसुदा तयार करण्याचा प्रयत्न करू. तसेच आजच्या बैठकीत चार बाबींवर चर्चा करण्यात आली. यामध्ये डीपफेकचा शोध घेणे, डीपफेकला आळा घालणे, यासंदर्भात जागरूकता निर्माण करणे आणि याविषयी तक्रार आणि तात्काळ कारवाई कशी करता येईल? या विषयांवर चर्चा करण्यात आली. आमची पुढील बैठक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यावेळी आज झालेल्या निर्णयांवर अधिक चर्चा होईल.

दरम्यान, डीपफेकचा फटका अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटपटू आणि राजकीय नेत्यांना बसलेला आहे. अलिकडेच अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा अनेकांनी तीव्र शब्दांत निषेध करून कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचा देखील डीपफेक फोटो व्हायरल झाला होता. तर नवरात्रीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गरबा खेळतानाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

शरद पवार गटातील ‘यांची’ खासदारकी रद्द करा, अजित पवार गटाची मागणी

यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले होते. आपण शाळेत असताना देखील कधीही गरबा खेळलो नसल्याचे मोदी त्यावेळी म्हणाले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल G20 वर्च्युअल समिटमध्ये डीपफेकच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली होती. “एआयच्या नकारात्मक प्रभावांबद्दल जग चिंतेत आहे. भारताला वाटतं की आपण एआयसाठी जागतिक नियमांवर एकत्र काम केले पाहिजे. समाजासाठी डीपफेक किती धोकादायक आहे हे समजून घेणे, तसेच यांदर्भात आपल्याला पुढे काम करण्याची गरज आहे. एआय लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, ते समाजासाठी सुरक्षित असले पाहिजे अशी आमची इच्छा आहे.” असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले होते.

One Comment on “डीपफेक संदर्भात केंद्र सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *