पूजा खेडकर प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्र सरकारने समिती नेमली

दिल्ली, 12 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर या सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. प्रशिक्षणार्थी असताना नागरी सेवक म्हणून आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी विरोधकांनी केली आहे. आता पूजा खेडकर प्रकरणाची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. त्यानुसार पूजा खेडकर यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती 2 आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये पूजा खेडकर या दोषी आढळून आल्या, तर त्यांना त्यांची नोकरी देखील गमवावी लागू शकते.

https://x.com/ANI/status/1811413584502518157?s=19

पूजा खेडकर यांच्यावरील आरोप

पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अपंगत्व आणि नॉन क्रिमिलेयरचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप आहे. याशिवाय आयएएस प्रशिक्षणार्थी असलेल्या पूजा खेडकर यांनी त्यांच्या व्हीआयपी नंबर प्लेट असलेल्या खाजगी ऑडी कारवर लाल-निळे दिवे लावल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. तसेच त्यांच्या कारवर महाराष्ट्र शासन असे देखील लिहिण्यात आले होते. याशिवाय पूजा खेडकर यांनी पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त होण्याच्या आधी अधिकाऱ्यांकडे विविध प्रकारच्या अतिरिक्त मागण्या देखील केल्या होत्या. यासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून पूजा खेडकर यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर मनमानी केल्याच्या आरोपावरून पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशीम येथे बदली करण्यात आली होती.

https://x.com/ANI/status/1811321574546616781?s=19

अनेक प्रश्न उपस्थित

पूजा खेडकर यांच्यावर नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी बनावट अपंगत्व आणि नॉन क्रिमिलेयर यांची प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोपही आहे. दरम्यान, पूजा खेडकर यांची स्वतःची मालमत्ता 17 कोटी रुपये आणि वडिलांची मालमत्ता 40 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. नॉन क्रिमिलेयरसाठी पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या वडिलांची संपत्ती 40 कोटी रुपये असेल, तर त्या नागरी सेवा परीक्षेसाठी नॉनक्रिमी लेयर प्रमाणपत्र कशा सादर करू शकतात? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पूजा खेडकर यांनी या बनावट अपंगत्व आणि क्रिमिलेयरच्या प्रमाणपत्रांचा वापर करून यूपीएससीमध्ये निवडीसाठी विशेष सवलत मिळवली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरी सेवा परीक्षेत कमी गुण मिळवूनही पूजा खेडकर या उत्तीर्ण झाल्या असल्याचे ही म्हटले जात आहे. या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी समाज माध्यमातून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *