केंद्र सरकारने विविध राज्यांना केली मदत जाहीर! महाराष्ट्रासाठी सर्वाधिक निधी मंजूर

दिल्ली, 02 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) मधून आगाऊ रक्कम म्हणून 14 पूरग्रस्त राज्यांना 5858.60 कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे. यामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक 1492 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान, यंदा राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे तसेच नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांसाठी राज्य सरकारने केंद्राकडे मदत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, केंद्राने राज्य सरकारची ही मागणी मान्य करत त्यासाठी महाराष्ट्राला सर्वाधिक निधी मंजूर केला.

https://x.com/PIBMumbai/status/1841340778011824520?t=jxc7fBbyNrRbiKChjIGkvA&s=19

https://x.com/mieknathshinde/status/1841160327414874403?t=RiOP42KL8Fo9i4XuyrL3AA&s=19

मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्र सरकारचे आभार

त्याबद्दल राज्य सरकारने केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. “महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे काही मागितले की ते लगेचच मिळते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1 हजार 492 कोटींचे पॅकेज जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचा उल्लेख नेहमीच अन्नदाता असा करतात. नैसर्गिक आपत्तीच्या काळात विशेष मदत जाहीर करून त्यांनी आपण कोणत्याही संकटात शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या पाठीशी आहोत, हे दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे हार्दिक आभार,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1841176045594030242?t=u_vhcbbgvPDHR5HN1xkAwg&s=19

अजित पवारांनी मानले आभार

तसेच याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीशी उभे राहून, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून केंद्रीय वाटा म्हणून 1492 कोटींची आगाऊ रक्कम आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून आगाऊ रक्कम जारी केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. ही रक्कम आम्हाला आमच्या लोकांना येणाऱ्या अडचणींना प्रभावीपणे कमी करण्यात मदत करेल आणि कायमस्वरूपी आराम मिळवून देईल.

कोणत्या राज्यांना किती निधी?

यावेळी केंद्र सरकारने महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशला 1036 कोटी रुपये, आसामला 716 कोटी रुपये, बिहारला 655.60 कोटी रुपये, गुजरातला 600 कोटी रुपये, हिमाचल प्रदेशला 189.20 कोटी रुपये, केरळला 145.60 कोटी रुपये, मणिपूरला 50 कोटी रुपये, मिझोरामला 21.60 कोटी रुपये, नागालँडला 19.20 कोटी रुपये, सिक्कीमला 23.60 कोटी रुपये, तेलंगणाला 416.80 कोटी रुपये, त्रिपुराला 25 कोटी रुपये आणि पश्चिम बंगालला 468 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावर्षी अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे या राज्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा नुकसानग्रस्त नागरिकांना ही मदत देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *