नवी दिल्ली, 16 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदारासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात ऊसाचा रस आणि मॉलॅसिस पासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातली होती. त्यानंतर केंद्र सरकारने त्यांचा हा निर्णय आज मागे घेतला आहे. मात्र केंद्राने हा निर्णय मागे घेताना, साखर कारखानदारांना 17 लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्याची परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने 7 डिसेंबर रोजी ऊसाचा रस आणि मॉलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार केंद्र सरकारच्या या निर्णयावर नाराज होते. केंद्राने त्यांचा हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली होती. तर देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमती आणि उसाचे उत्पन्न कमी होण्याच्या भीतीने सरकारने गेल्या आठवड्यात इथेनॉल उत्पादनात उसाचा रस आणि मोलॅसिसचा वापर बंद केला होता.
https://x.com/PTI_News/status/1735679927020646643?s=20
दरम्यान, केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी सघटनेचे प्रमुख राजू शेट्टी केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा शेतकरी एकजुटीचा विजय असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तीव्र आंदोलनाला यश आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारने 34 ते 35 लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी देखील राजू शेट्टी यांनी केली आहे.