अल्मोडा , 04 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) उत्तराखंड राज्यातील अल्मोडा येथील एका खोल दरीत एक प्रवासी बस कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.04) घडली. या अपघातात 36 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 27 जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आजच्या दिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करीत अल्मोडा बस अपघातातील जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी भाजप नेते अनिल बलूनी हे देखील उपस्थित होते.
https://x.com/AHindinews/status/1853424130974253151?t=jxUtXxbZ_FBTedETYgFnnw&s=19
https://x.com/AHindinews/status/1853397729713811715?t=ABgexpcbRpdxc880AAtOSA&s=19
दोषींवर कारवाई करण्याचे आदेश
दरम्यान, या अपघातातील जखमींना एम्स ऋषिकेश, सुशीला तिवारी हॉस्पिटल हल्द्वानी आणि रामदत्त जोशी संयुक्त रुग्णालय याठिकाणी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिले आहेत. या दुर्घटनेत जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे ते यावेळी म्हणाले.
https://x.com/AHindinews/status/1853365144186945695?t=fKcbBG-FsNSYScqK0oZO8A&s=19
अपघाताचे कारण अस्पष्ट
अपघातावेळी या बसमध्ये 60 हून अधिक प्रवासी होते. ही प्रवासी बस सोमवारी (दि.04) अल्मोडा येथील रामनगरच्या दिशेने जात होती. त्यावेळी हा अपघात झाला. या घटनेची माहिती कळताच पोलीस, एसडीआरएफ, एनडीआरएफ, अग्निशमन दल यांच्यासह स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी या सर्वांनी बचावकार्य सुरू करून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. परंतु, या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, त्याचा सध्या पोलीस तपास करीत आहेत.
https://x.com/PMOIndia/status/1853336819548791005?t=-s0RtJ3JExPNYsiYh9VwTQ&s=19
पीडितांना सरकारकडून आर्थिक मदत
दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त करीत मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.