कोची, 14 जून: (विश्वजीत खाटमोडे) कुवेतमधील आगीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 45 भारतीयांचे पार्थिव आज भारतात आणण्यात आले आहेत. भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने त्यांना केरळमधील कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. 45 भारतीयांचे मृतदेह घेऊन हवाई दलाचे विमान आज कोचीला पोहोचले आहे. गुरुवारी कुवेतला रवाना झालेले देशाचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग हे देखील या विमानात होते. तसेच यावेळी केंद्रीय मंत्री सुरेश गोपी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे विमानतळावर उपस्थित होते. याप्रसंगी, कुवेतमधील आगीच्या घटनेतील मृतांचे पार्थिव कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले.
https://twitter.com/AHindinews/status/1801509379013021834?s=19
https://twitter.com/AHindinews/status/1801493186973479395?s=19
मृतांमध्ये सर्वाधिक केरळचे नागरिक
या आगीच्या दुर्घटनेतील मृतांमध्ये केरळमधील 23, तामिळनाडूमधील 7, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी 3, ओडिशातील 2 आणि बिहार, पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड आणि हरियाणातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दरम्यान, कुवेतच्या मंगफ भागात एका सहा मजली इमारतीला बुधवारी (दि.13) पहाटेच्या सुमारास अचानकपणे भीषण आग लागली. या आगीत एकूण 49 जणांचा मृत्यू झाला. त्यातील 45 जण भारतीय असल्याचे स्पष्ट झाले. या 45 भारतीयांचे मृतदेह घेऊन हवाई दलाचे विमान आज कोचीला दाखल झाले आहे.
https://twitter.com/AHindinews/status/1801486375558255090?s=19
पीडितांना अर्थिक मदत जाहीर
दरम्यान या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत देण्यात येणार आहे. एनबीटीसी या मंगफ येथील कामगार शिबिराची मालकी असलेल्या कंपनीने प्रत्येक पीडित कुटुंबाला 8 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. एनआरआय व्यापारी आणि यूएई स्थित लुलु ग्रुपचे अध्यक्ष एमए युसुफली यांनी आगीत जीव गमावलेल्या व्यक्तीच्या प्रत्येक कुटुंबासाठी 5 लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. सोबतच केरळ सरकारने देखील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये आणि जखमींना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.