बारामती, 4 सप्टेंबरः बारामती शहरासह परिसरात आज, 4 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 2 च्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस झाल्याने बारामतीकरांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र शहरासह परिसरात झालेल्या या पावसामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले आहे.
जवळ जवळ पावसाळा संपत आला आहे. मात्र तरीही बारामती नगर परिषदेच्या हद्दीतील मुख्य रस्त्यांना प्रत्येक पावसात तळ्याचे स्वरुप आले आहे. पावसाळा ऋतु सुरु होण्याआधी गेल्या वर्षापासून बारामती नगर परिषदेने कोट्यावधी रुपये खर्चून मान्सूनपूर्व कामे केली. मात्र या मान्सूनपूर्व कामांवर केलेला खर्चावर पावसाने मात्र पाणी फिरवल्याचे चित्र आहे. यामुळे बारामतीकरांच्या कष्टाचा पैसा हा पाण्यात गेल्याचे सध्या दिसत आहे.
बारामती शहरासह परिसरात आज, (रविवारी) झालेल्या पावसामुळे प्रशासकिय इमारत समोरील इंदापूर रोडवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक जवळील रस्त्यावर पावसाचे पाणी साठून तळ्याचे स्वरुप आले. या पाण्यात वाहने सावकाश जाताना दिसतात, तर काही स्थानिक मुलं त्या पाण्यात खेळण्याचा आनंद घेताना दिसत आहे. सदर ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात रस्त्याला तळ्याचे स्वरुप येते. मात्र याकडे बारामती नगर परिषदेने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचे दिसत आहे.
बारामतीत पुन्हा पावसाला सुरुवात!