झाली घोषणा! हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात या दिवशी प्रवेश होणार

इंदापूर, 04 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा भाजपला मोठा धक्का दिला आहे. इंदापूर तालुक्यातील भाजपचे मोठे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.05) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघातून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे जवळपास नक्की झाले आहे. यासोबतच हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनाही भाजपच्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे.

https://x.com/Jayant_R_Patil/status/1842204238765555946?t=yy2IgW8VElEe0pbOt34vHg&s=19

7 ऑक्टोबर रोजी पक्षप्रवेश!

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाची तारीख निश्चित झाली आहे. हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश येत्या 7 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करून दिली आहे. “राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात येण्याचा निर्णय घेतला. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे सोमवार दि. 7 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता त्यांचा पक्ष प्रवेश होईल.” असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुन्हा पाटील विरूद्ध भरणे लढत?

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा इंदापूर तालुक्यातील गावागावांत रंगू लागल्या होत्या. त्या चर्चा आज खऱ्या ठरल्या आहेत. दरम्यान, त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघात पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील विरूद्ध दत्तात्रय भरणे अशी लढत पहायला मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे इंदापूरात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. परंतु, त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

2014 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच पराभव

तत्पूर्वी, गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झालेला आहे. यामध्ये 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा दत्तात्रय भरणे यांनी पराभव केला होता. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर मतदारसंघात सर्वप्रथम 1999 मध्ये विधानसभेची अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी विजय मिळवला होता. तेंव्हापासून हर्षवर्धन पाटील यांचा तेथे दर विधानसभा निवडणुकीत विजय झाला होता.

परंतु, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसमधून भाजप पक्षात प्रवेश केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून लढताना देखील हर्षवर्धन पाटील यांचा दत्तात्रय भरणे यांनी पराभव केला होता. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत जर शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिली तर इंदापूरात यंदाची ही विधानसभेची निवडणूक चुरशीची होईल, यात काही शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *