दिल्ली, 08 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत नागरिकांना मिळणाऱ्या रकमेत वाढ करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. या संदर्भातील पत्र सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांना लिहिले आहे. या पत्रात त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेत तीन हजारांपर्यंत वाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सोबतच सुप्रिया सुळे यांनी मनरेगा अंतर्गत अकुशल कामगारांना दिल्या जाणाऱ्या रोजगाराच्या रकमेत देखील वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे केंद्र सरकार त्यांच्या या मागण्यांचा विचार करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://x.com/supriya_sule/status/1821041618151207281?s=19
सध्या दिली जाणारी रक्कम अपुरी पडतेय!
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागातील गोरगरीबांना परवडणाऱ्या दरात घरे दिली जातात. यासाठी ग्रामीण भागात दीड लाख तर शहरी भागात अडीच लाख रुपये दिले जातात. परंतु बांधकाम क्षेत्रातील वाढत्या महागाईमुळे ही रक्कम अपुरी ठरत आहे. परिणामी अनेक पात्र कुटुंबांसाठी ही योजना अपुरी ठरत आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात मिळणारी रक्कम किमान तीन लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची मागणी आहे. या योजनेसाठी पात्र नागरिकांची संख्या वाढत असताना केंद्र सरकारने योजनेची समीक्षा करून टार्गेटमध्ये त्या प्रमाणात वाढ करणे अपेक्षित आहे. परंतु तसे होताना दिसत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी या पत्रात म्हटले आहे.
मनरेगा कामगारांच्या रोजगारात वाढ करावी
तसेच महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांसाठी मोदी आवास योजना सुरू केली आहे. परंतु, या योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला नाही. केंद्र सरकारने याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून एकतर पुरेसा निधी उपलब्ध करावा किंवा ही योजनाच केंद्र सरकारच्या अखत्यारीत घेण्याची गरज आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. याखेरीज मनरेगा अंतर्गत अकुशल कामगारांना दिला जाणारा रोजगार प्रतिदिन 50 रुपये ही अतिशय तुटपुंजी रक्कम आहे. वाढती महागाई लक्षात घेता ही रक्कम वाढवून देणे गरजेचे आहे. तसेच या सर्व विषयांत वैयक्तिक लक्ष घालून या योजनेचा लाभ अधिकाधिक कुटुंबांना मिळावा याबाबत उचित कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली आहे.