नागपूर, 19 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत देण्यास सुरूवात झाली आहे. त्यानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या मदतीचे प्रतिनिधिक स्वरूपातील चेक देण्यात आले आहेत. नागपूरच्या विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
https://twitter.com/Devendra_Office/status/1736745283378389215?s=19
दरम्यान गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिरायत पिकांसाठी 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांना 36 हजार रुपये प्रतिहेक्टरी या दराने ही मदत देण्यात येणार आहे. मात्र ही मदत 3 हेक्टरपर्यंतच असणार आहे. याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. यावेळी पीक नुकसानीची मदत म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात सुमारे 14 शेतकऱ्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मदतीच्या चेकचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.