पुणे, 01 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे आज (1 जानेवारी) 207 व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत आहे. या ऐतिहासिक आणि गौरवशाली दिवशी राज्यभरातून तसेच परराज्यातून लाखो आंबेडकर अनुयायी आणि सामाजिक कार्यकर्ते येथे दाखल झाले आहेत. 1 जानेवारी 1818 रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेली ऐतिहासिक लढाई भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. या लढाईत इंग्रजांच्या सैन्याने महार रेजिमेंटमधील सैनिकांच्या मदतीने पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला पराभूत केले. या विजयाच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा येथे दरवर्षी लाखो अनुयायी येतात.
https://x.com/Prksh_Ambedkar/status/1874281220302897361?t=7MLNZsnJSUQiaQHVRGO5DQ&s=19
यावर्षी विजयस्तंभाला आकर्षक फुलांनी सजवले असून विद्युत रोषणाईने या स्थळाला विशेष शोभा मिळाली आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात आली आहे. या अनुयायांची कोणताही प्रकारे गैरसोय होणार नाही, त्याची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच हा कार्यक्रम शांततेत पार पडावा त्यासाठी याठिकाणी हजारो पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, शौर्य दिनानिमित्त आज अनेक मान्यवरांनी विजयस्तंभाला अभिवादन केले. यामध्ये राज्याचे क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक सामाजिक नेते आणि राजकीय व्यक्तींनी सहभाग नोंदवला. शौर्य दिन हा सामाजिक एकतेचे प्रतीक मानला जातो. कोरेगाव भीमा येथे एकत्र येणारे लाखो अनुयायी आपल्या ऐतिहासिक वारशाचा अभिमान व्यक्त करतात आणि समानतेचा संदेश पसरवतात. हा दिवस केवळ एका विजयाचे स्मरण नसून, समाजातील विविधतेतील एकतेचे प्रतीक म्हणूनही ओळखला जातो.