शिंदे-नार्वेकर भेटीवर ठाकरे गटाचा आक्षेप; सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

मुंबई, 10 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर आज सायंकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल जाहीर करणार आहेत. तर या निकालाच्या आधी राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने आता सुप्रीम कोर्टात राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटी विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. हे प्रतिज्ञापत्र ठाकरे गटाचे प्रदोत सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केले आहे. आमदार अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्याच्या आधी सभापतींनी एकनाथ शिंदे यांची भेट घेणे अत्यंत अयोग्य असल्याचे ठाकरे गटाने या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

https://twitter.com/ANI/status/1744657977548910817?s=19

शिंदे-नार्वेकर भेटीवर आक्षेप

अशा महत्त्वाच्या प्रकरणावर निकाल देण्याआधी न्यायमूर्ती कोणत्याही एका पक्षाच्या नेत्याची भेट कशी काय घेऊ शकतात? विधानसभा अध्यक्षांनी निष्पक्षपणे या प्रकरणाचा निकाल देणे आवश्यक आहे. विधानसभा अध्यक्षांचे हे कृत्य कायद्याचे उल्लंघन आहे. असे ठाकरे गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेच्या याचिकांवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी देखील ठाकरे गटाने या अर्जात केली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट यासंदर्भात काय निर्णय घेणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

8 जानेवारी रोजी घेतली होती भेट!

तत्पूर्वी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 8 जानेवारी रोजी मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यांच्या भेटीवरून राज्याचे राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांनी त्यांच्या या भेटीवर टीका केली आहे. तर ठाकरे गटाने यासंदर्भात सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे. “लवाद म्हणून विधानसभा अध्यक्षांनी निकालापूर्वी दोन वेळा घटनाबाह्य सरकारची भेट घेतलीय, म्हणजे न्यायमूर्तीचं इथे आरोपीची भेट घेताहेत. न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील, तर मग आम्ही ह्यांच्याकडून काय न्यायाची अपेक्षा करायची?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण 

तर यासंदर्भात राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी मुख्य व्यक्तीशी भेट घेणे गरजेचे आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, असे राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. तसेच मी जो निर्णय घेणार आहे तो संविधानाच्या तरतुदीच्या आणि नियमांच्या आधारावर घेणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *