ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अटकेची मागणी

मुंबई, 05 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. या घटनेत महेश गायकवाड यांच्यासह त्यांचे सहकारी राहुल पाटील हे जखमी झाले आहेत. या प्रकरणावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे माझे कोट्यवधी रुपये पडले आहेत, असे वक्तव्य आमदार गणपत गायकवाड यांनी केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने सामना वृत्तपत्रातून करण्यात आली आहे.

असे मिर्झापुरी राजकारण महाराष्ट्रात देखील घडू लागले: सामना

महाराष्ट्रात पोलीस ठाणीही सुरक्षित नसतील तर मग काहीच सुरक्षित नाही. कायदा आणि सुव्यवस्था गुंडांच्या अड्ड्यावर कचरा काढत आहे. पोलीस ठाण्यांवरच हल्ले करणे, पोलीसप्रमुख, जिल्हाधिकाऱ्यांच्या हत्या घडवणे हे मिर्झापुरी राजकारण उत्तर प्रदेश, बिहारात अनेकदा घडते. आता हे प्रकार महाराष्ट्रात घडू लागले व या भयानक गुन्हेगारी संघर्षाचे सूत्रधार स्वतः राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आहेत. शिंदे मुख्यमंत्री असतील तर राज्यात फक्त गुन्हेगारांचीच पैदास होईल, असा आरोप करून भाजपचे ज्येष्ठ आमदार गणपत गायकवाड हे तुरुंगात गेले असल्याचे सामना वृत्तपत्रात म्हटले आहे.

या घटनेवर सत्ताधाऱ्यांची अद्याप प्रतिक्रिया नाही, सामनातून निशाणा

“स्वतः मुख्यमंत्री हे आपल्या गँगच्या जखमींना पाहण्यासाठी इस्पितळात गेले व हळहळले. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातले हे गँगवॉर संपूर्ण देशाने पाहिले. त्यामुळे ते देशाचे गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान मोदी यांनीही पाहिलेच असेल. इतक्या भयंकर घटनेवर त्यांची अद्यापि प्रतिक्रिया नाही. बिगर भाजपशासित राज्यात मुंगी पादली तरी या मंडळींची प्रतिक्रिया येते, पण महाराष्ट्रात शहा-मोदी यांनी नेमलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने गुंडगिरी, रक्तपात सुरू आहे. त्यावर हे ‘संस्कार भारती’ तोंड उघडायला तयार नाहीत. आमच्यासारख्या चांगल्या माणसांना एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार केले, असे आमदार गायकवाड यांनी सांगितले,” असे सामना वृत्तपत्रात म्हटले आहे.

ईडीने त्यांना समन्स बजावला पाहिजे, सामनातून मागणी

“भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी एक महत्त्वाचा कबुलीजबाब दिला. एकनाथ शिंदे यांच्याकडे माझे कोट्यवधी रुपये पडले आहेत. गायकवाड यांचा कबुलीजबाब हाच एफआयआर समजून हे ‘मनी लॉण्डरिंग’चे प्रकरण आहे या दिशेने तपास व्हायला हवा. ‘ईडी’ने गायकवाड यांचा जबाब घेऊन हेमंत सोरेनप्रमाणे शिंदे यांच्यावर त्वरित कठोर कारवाई केली पाहिजे. हे कोट्यवधी रुपये काही सरळ मार्गाने आलेले नाहीत. गुन्हेगारीतून आलेला पैसा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला. हे सरळ ‘मनी लॉण्डरिंग’चे प्रकरण आहे व त्याबद्दल त्यांना ‘पीएमएलए’ कायद्याने अटकच व्हायला हवी. ईडी’वाल्यांनो, ऐकताय ना? ऐकले असेल तर ‘वर्षा’ बंगल्यावर समन्स पाठवा,” अशी मागणी सामना वृत्तपत्रातून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *