राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात ठाकरे आणि शिंदे गटाची कोर्टात धाव

मुंबई, 16 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर केला होता. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला होता. राहुल नार्वेकर यांच्या या निकालाविरोधात ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतली आहे. यासंदर्भात ठाकरे गटाच्या वतीने त्यांच्या या निर्णयाला आव्हान देणारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय रद्द ठरविण्यात यावा, अशी मागणी ठाकरे गटाने या याचिकेतून केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने देखील याप्रकरणी हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी शिंदे गटाने या याचिकेतून केली आहे.

https://twitter.com/ANI/status/1746861987840340207?s=19

राहुल नार्वेकरांनी निकाल दिला होता

दरम्यान, जून 2022 मध्ये शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर ठाकरे गटाने शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. तसेच शिंदे गटाने देखील ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्र केले जावे, म्हणून कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवला होता. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी या प्रकरणाचा निकाल दिला.

ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव

राहुल नार्वेकर यांनी यावेळी निकाल देताना खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी शिंदे आणि ठाकरे गटांतील कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवण्यास नकार दिला होता. यावेळी त्यांनी ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेच्या याचिका फेटाळल्या होत्या. तसेच भरत गोगावले यांची प्रतोदपदी झालेली निवड वैध असल्याचे राहुल नार्वेकर यांनी या निकालात म्हटले होते. या निर्णयामुळे नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाचा अपमान केला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यामूळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. यावेळी ठाकरे गटाने एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाला आव्हान दिले आहे.

शिंदे गटाची हायकोर्टात याचिका

तर शिंदे गटाने देखील राहुल नार्वेकर यांच्या या निकालाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आम्हीच खरी शिवसेना असल्यामुळे ठाकरे गटातील 14 आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र का ठरवले नाही? असा सवाल त्यांनी या याचिकेतून केला आहे. तसेच ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी शिंदे गटाने या याचिकेतून केली आहे. त्यामुळे कोर्ट त्यांच्या या याचिकेवर काय निकाल देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *