मुंबई, 06 जून: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील चेंबूर परिसरात एलपीजी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर तेथे आग लागली. या आगीत 10 जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाला या स्फोटाची माहिती आज सकाळी साडेसातच्या सुमारास कळाली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. दरम्यान, या दुर्घटनेतील जखमींमध्ये 6 पुरूष आणि 4 महिलांचा समावेश आहे.
https://twitter.com/AHindinews/status/1798594178944802838?s=19
जखमींना रुग्णालयात दाखल
या जखमींपैकी 8 जणांना मुंबईतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच एकाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. तर एका व्यक्तीवर रुग्णालयात उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. गॅस सिलिंडर लीकेज असल्यामुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज चेंबूर अग्निशमन केंद्राचे वरिष्ठ अधिकारी केव्ही शिर्के यांनी व्यक्त केला आहे.
स्फोटाचे कारण अस्पष्ट
मात्र, या स्फोटाचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याचा सध्या पोलिसांकडून तपास जात आहे. या स्फोटामुळे संबंधित घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गॅस सिलिंडर स्फोटाची तीव्रता एवढी होती की, त्यामुळे अनेक दुकानांच्या आणि वाहनांच्या काचांना तडे गेले होते. तसेच या स्फोटामुळे शेजारी असलेल्या दुकानांचे देखील नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, या आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.