जालना जिल्ह्यात भीषण अपघात, आषाढी वारीवरून परतत असलेल्या 7 वारकऱ्यांचा दुदैवी मृत्यू

जालना, 19 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) आषाढी वारीवरून घरी परतत असलेल्या 7 वारकऱ्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. जालना-राजूर या रस्त्यावरील तुपेवाडीजवळ हा अपघात झाला. या वारकऱ्यांना घेऊन चाललेली जीप विहिरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये 8 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याची माहिती जालनाचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दिली आहे.

https://x.com/ANI/status/1813971471313866859?s=19

असा झाला अपघात

या अपघातावेळी जीपमध्ये 15 जण होते. त्यातील काही लोक पंढरपूरहून राजूरच्या दिशेने जात होते. त्यावेळी जालना जिल्ह्यातील तुपेवाडी जवळ एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची जीप या विहिरीत पडल्याचे सांगितले जात आहे. दुर्दैवाने या अपघातात 7 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर 8 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ड्रायव्हरचा देखील समावेश आहे. हा अपघात घडल्यानंतर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत बुडालेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्र्यांनी घेतली अपघाताची माहिती

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून या अपघाताची माहिती घेतली. यावेळी त्यांनी मृत व्यक्तींच्या संदर्भांत माहिती घेतली. जखमींच्या सर्व उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई सुरू आहे, अशी माहिती जालनाचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दिली आहे. दरम्यान, या अपघातातील मृतांची ओळख पटली असून, जखमींची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *