नवी दिल्ली, 20 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर काल सुनावणी झाली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीत तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह वापरण्यास परवानगी दिली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला देखील आगामी लोकसभा निवडणुकीत घड्याळ चिन्ह वापरण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. मात्र, त्याचवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घड्याळ चिन्हाच्या वापराबाबत अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत.
https://x.com/ANI/status/1770036260444180622?s=20
चिन्ह वापरताना नोट लिहावी लागणार
या सुनावणीवेळी राष्ट्रवादी पक्षाला घड्याळ चिन्ह वापरताना मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेतील वृत्तपत्रांमध्ये जाहीर नोटीस प्रसारित करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या नोटीसीमध्ये घड्याळ चिन्ह देण्यासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे! असे नमूद करण्यास सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाला निवडणुकीच्या प्रचारात घड्याळ चिन्ह वापरत असताना नोट म्हणून ‘घड्याळ चिन्ह देण्यासंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे’, असे लिहिणे बंधनकारक असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
आधीच्या सुनावणीत काय घडलं?
तत्पूर्वी, गेल्या सुनावणीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला शरद पवार यांचा फोटो वापरू नये, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. यासंदर्भात कोर्टाने अजित पवार यांना सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, अजित पवार यांनी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. दरम्यान, अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा फोटो वापरत असल्याची तक्रार शरद पवार यांच्या पक्षाने सुप्रीम कोर्टाकडे केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने असे निर्देश दिले होते.