बारामती, 5 सप्टेंबरः बारामती शहरातील बसस्थानकाचे तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे. येत्या दोन तीन दिवसात बारामती शहरातीलच कसबा येथे या बस स्थानकाचे स्थलांतर होईल, अशी माहिती बारामती आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी दिली.
बारामतीच्या रस्त्यांना आले तळ्याचे स्वरुप!
बारामती शहरातील सध्याच्या बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. जुने बसस्थानक पाडून त्या जागी नवीन स्थानक उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. सध्या ज्या जागेमध्ये बसस्थानक आहे, त्या जागेचे सपाटीकरण आणि इतर पूरक कामे करायची आहे. यामुळे सदर जागा रिकामी करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीमधीलच कसबा येथील राष्ट्रवादी भवन शेजारील मोकळ्या जागेत तात्पुरते बसस्थानक तयार करण्यात आले आहे.
नवीन बसस्थानकाचे काम पूर्ण होईपर्यंत कसबामधील बसस्थानकातूनच बारामती आगाराचे कामकाज चालणार आहे. सर्व बसेस येथून निघून येथेच पुन्हा येणार आहेत, अशी माहिती गोंजारी यांनी दिली.
दरम्यान, बारामती बसस्थानकाच्या सुरु असलेल्या कामाचा वेग पाहता येत्या चार महिन्यात हे काम पूर्णत्वास जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र कसबा येथील कारभारी सर्कल येथे दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. आता बसस्थानक याच परिसरात येणार असल्याने अधिकच वाहतुकी कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेता वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी येथे वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.