टेम्पो ट्रॅव्हलर खोल दरीत कोसळला, अपघातात 12 जणांचा मृत्यू

रुद्रप्रयाग, 15 जून: (विश्वजीत खाटमोडे) उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमधील बद्रीनाथ महामार्गावरील रेंतोली गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. येथे एक टेम्पो ट्रॅव्हलर खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात आतापर्यंत 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत 14 जण जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी 11.30 च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक लोक, पोलीस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांनी बचावकार्य सुरू करून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

https://twitter.com/AHindinews/status/1801952528948658352?s=19

जखमींवर उपचार सुरू

यांतील काही जखमींवर रुद्रप्रयाग येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काही गंभीर जखमींना एअरलिफ्ट करून ऋषिकेश येथील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींना योग्य उपचार मिळावेत यासाठी आम्ही पूर्ण लक्ष देत आहोत. अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली आहे. तर पुष्कर सिंह धामी यांनी रुद्रप्रयाग जिल्हा दंडाधिकारी यांना घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडच्या ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. जखमींवर उपचार सुरू असून, त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात येत आहे. चांगल्या उपचारासाठी सर्व व्यवस्था रुग्णालयाकडून करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

https://twitter.com/PMOIndia/status/1801947744405172562?s=19

केंद्र सरकारकडून आर्थिक मदत जाहीर

दरम्यान, या अपघाताच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी यावेळी प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसेच जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. “उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये झालेला रस्ता अपघात हृदयद्रावक आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या मनापासून संवेदना. यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी कामना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले आहे,” असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालयाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *