दिल्ली, 09 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर भारताने बांगलादेशविरूद्धची 3 सामन्यांची ही टी-20 मालिका 2-0 ने जिंकली आहे. दिल्लीच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 221 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ निर्धारित षटकांत 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 135 धावा करू शकला. भारताकडून नितीश रेड्डीने 74 धावांची शानदार खेळी केली. तसेच रिंकू सिंग ने देखील अर्धशतक झळकावून 53 धावा केल्या. या सामन्यात भारताचा नितीश रेड्डी हा सामनावीर ठरला. त्याने 74 धावांची खेळी करण्यासोबतच 2 विकेट देखील घेतल्या.
https://x.com/BCCI/status/1844058960783179881?t=WE76D7WV1ypf-9Tk__PBUQ&s=19
https://x.com/BCCI/status/1844068498663948625?t=ZzwY8mbntsVOcSGJOA7i5A&s=19
नितीश रेड्डी चमकला!
तत्पूर्वी, बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतो याने भारताविरूद्धच्या या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघाची खराब सुरूवात झाली. यावेळी बांगलादेशने पहिल्या सहा षटकांत भारताच्या 3 फलंदाजांना बाद केले. त्यानंतर नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग यांनी आक्रमक फलंदाजी करत भारतीय संघाचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली. या सामन्यात नितीश रेड्डीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने या सामन्यात 34 चेंडूंत चार चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 74 धावांची आक्रमक खेळी केली. तसेच रिंकू सिंगने देखील 29 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 53 धावा करून त्याला चांगली साथ दिली. त्यानंतर हार्दिक पांड्याने 19 चेंडूंत 32 धावा केल्या. अशा प्रकारे भारताला बांगलादेशसमोर 222 धावांचे लक्ष्य ठेवता आले. या सामन्यात बांगलादेशकडून रिशाद हुसेनने 3 तर तस्किन अहमद, तन्झिम हसन शाकिब आणि मुस्तफिजुर रहमानने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
भारतीय गोलंदाजांची शानदार कामगिरी
प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची फलंदाजी अत्यंत खराब झाली. या सामन्यात बांगलादेश संघाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. बांगलादेशकडून महमुदुल्ला याने 39 चेंडूत सर्वाधिक 41 धावांची खेळी केली. तर भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे बांगलादेशच्या उर्वरित फलंदाजांचा टिकाव लागला नाही. त्यामुळे 222 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 135 धावाच करता आल्या. भारताकडून नितीश रेड्डी आणि वरूण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2 विकेट, तर अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, मयंक यादव आणि रियान पराग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.