तलाठी भरतीची 23 जिल्ह्यांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध

मुंबई, 24 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील तलाठी भरतीची अंतिम निवड यादी आज जाहीर करण्यात आली आहे. महाभूमीच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध झाला आहे. यावेळी महसूल विभागाकडून तलाठी भरतीची राज्यातील 23 जिल्ह्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, बीड, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि हिंगोली या जिल्ह्यांची यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यादीचा निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा

तर उमेदवारांना ही यादी mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर पाहता आणि डाऊनलोड करता येईल. तर उर्वरित 13 जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागांबाबत सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्याने, या 13 जिल्ह्यांची निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील निर्देशानंतर करण्यात येईल, अशी माहिती महसूल विभागाने प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.



निवड प्रतीक्षा यादीनंतर उमेदवारांची ओळख, प्रमाणपत्र व संबंधित कागदपत्रे यांची पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी तसेच समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही नियुक्ती पूर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीमार्फत केली जाणार आहे, याची माहिती प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त, आणि अतिरिक्त संचालक सरिता नरके यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *